मानसिक आजाराशी लढण्यासाठी माझी शस्त्रं
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 3 min read
मानसिक आजारातून आरोग्याकडे प्रवास सुरू करून त्यातून बाहेर पडणं ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. किंवा काही वेळा आजार नियंत्रणात ठेवून त्याच्यासोबत जगणं अपरिहार्य ठरतं. हा एक प्रकारचा खूप चढ-उतार, चिखल - वाळवंट, निसरडी वाट -अवघड घाट, डोंगर - दऱ्या असलेला लांबचा प्रवास आहे आणि त्यामुळेच त्याचं स्वरूप एखाद्या लढ्यासारखंच आहे. त्यासाठी जशी अगदी भरवशाची काही शस्त्रं आहेत तशीच काही शस्त्रं व्यक्तिपरत्वे कमी - जास्त उपयुक्त ठरणारी आहेत. एकाच व्यक्तीला प्रत्येक शस्त्रं वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रमाणात लागू पडू शकतं. एक खूप छान गोष्ट ही आहे की ह्यासाठी खूप विविध प्रकारचा आणि भरपूर शस्त्रसाठा उपलब्ध आहे! एकदा का आजारातून / अस्वास्थ्यातून सावरणाऱ्या व्यक्तीला ह्या लढाईचा आवाका लक्षात आला की कोणत्या वेळी काय लागू करायचं हे लक्षात येणं शक्य आहे. पायऱ्या-पायऱ्यांनी त्याचा विचार करू.
अनारोग्याकडून / आजाराकडून आरोग्याकडे प्रवास सुरू करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजे insight निर्माण होणं आणि ती टिकून राहणं. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला आजाराबद्दल निर्माण झालेली दृष्टी म्हणजे insight. त्यात प्रामुख्याने आजाराचं स्वरूप, त्यावरचे औषधोपचार, औषधोपचारांची बरे-वाईट परिणाम, त्यांचं महत्व ह्या गोष्टींचा अंतर्भाव होतो. ही अशीच आजाराबद्दलची दृष्टी आजाराने त्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांना असणं गरजेचं असतं. कारण आपण यापूर्वी बघितल्याप्रमाणे मानसिक आजारांचा सामना करताना कुटुंबाची साथ मोलाची असते.
हळूहळू अधिक खोलात जाऊन व्यक्तीला आजाराची स्वतःला जाणवणारी लक्षणं, त्या लक्षणांचा उद्रेक करणारे घटक, भावनांचे होणारे चढ - उतार, स्वतःच्या क्षमता, त्यांची आजारामुळे झालेली हानी, ती भरून काढण्यासाठी करावे लागणारे विशिष्ट प्रयत्न - उपाय, आजाराच्या स्वरूपामुळे येणाऱ्या मर्यादा हे सगळं लक्षात येणं, त्यावर काम करता येणं, आवश्यक ती मदत वेळीच घेता येणं शक्य आहे. ह्यामध्ये मानसोपचार मोलाची भूमिका बजावत असतात. त्यामुळेच औषधं आणि मानसोपचार ही दोन सर्वांना निश्चितपणे लागू पडणारी शस्त्रं आहेत. मात्र ती बरेचदा एकमेकांच्या बरोबरीने वापरावी लागतात.
लवकर योग्य निदान होऊन त्वरित योग्य औषधोपचार घेतले तर बऱ्याच आजारांमध्ये कालांतराने औषधं बंद होऊ शकतात. दीर्घकाळच्या मानसोपचारांनी इतर शस्त्रांच्या सहाय्याने ही लढाई आजाराने त्रस्त व्यक्ती स्वतंत्रपणे लढू शकते. इतर व्यक्तिगत आणि नियमित करण्याच्या उपायांमध्ये अगदी प्राथमिक आणि काही अंशी हमखास लागू पडणारे असे उपाय म्हणजे व्यायाम - शरीर श्रम - छंद जोपासना आणि डायरी लेखन आज या लेखात बघू. व्यायामामुळे स्नायूंमध्ये साठून राहिलेली ऊर्जा कार्यान्वित होते. नकारात्मक ऊर्जा उत्सर्जन संस्थेच्या माध्यमातून बाहेर फेकायला मदत होते. मेंदूमध्ये काही स्त्रावांच्या पाझरण्यामुळे शरीराला हलकेपणा येतो, उल्हसित वाटतं. त्यासाठी रोज कमीत कमी ४५ मिनिटं व्यायाम करायला हवा.
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला भावनांचे चढ - उतार आणि विचारांचा वेग याचा खूप त्रास होत असतो. शरीर श्रम करताना होणाऱ्या स्नायूंच्या हालचालींमुळे विचारांची गती कमी होते. भावनांच्या आवेगांना थोडा लगाम घातला जातो. तसंच औषधांच्या दुष्परिणामांना तोंड देण्यासाठी शारीरिक हालचाली मदत करतात. (उदा. स्नायू आखडणे, वजन वाढणे इ.)

छंद जोपासनेचा मुख्य फायदा म्हणजे व्यक्तीच्या आवडीची गोष्ट असल्यामुळे व्यक्ती त्यात रममाण होते. लक्ष विचारांवरून काढून दुसऱ्या गोष्टीवर एकाग्र करता येण्याची शक्यता वाढते. आवडीच्या गोष्टी यशस्वीरित्या पार पाडल्यामुळे आत्मविश्वास वाढतो. काहीच करू नये असं वाटण्यापासून काहीतरी करावं, काही गोष्टी आपल्याला नक्की जमतील असं वाटण्याकडे व्यक्तीचा प्रवास सुरू होतो. सकारात्मक विचार निर्माण व्हायला मदत होते.
डायरी लेखन हे एक महत्वाचं साधन आहे. मुळात जेवढ्या वेगाने विचार निर्माण होतात, ते कागदावर उतरवायला सुरूवात केली की, त्यांचा वेग मंदावतो. एकाच वेळी निर्माण होणाऱ्या अनेक विचारांच्या जाळ्यामुळे उडणारा गोंधळ व्यक्तीला दमवत असतो. विचारांमध्ये असलेल्या त्रुटी, विरोधाभास, अतार्किकता लक्षात यायला मदत होते. एकमेकांत गुंतलेले विचार वेगवेगळे करून बघता येतात. अर्थातच भावना - विचार यांच्यामध्ये अधिक सुसूत्रता, अधिक स्पष्टता येते. भावना - विचार व्यक्त करायला दुसरी व्यक्ती उपलब्ध नसणं, त्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय ते नेमकेपणाने न समजणं, मन मोकळं करण्यासाठी पुरेसा आणि योग्य वेळ न मिळणं, बोलताना योग्य शब्दप्रयोग करता न येणं, त्यामुळे निर्माण होणारे गैरसमज, त्यातून येणारा ताण या सगळ्या अडचणींवर आपोआप मात होते. शिवाय डायरीत केलेलं लेखन पुन्हा तशाच प्रसंगांमध्ये स्वतःच्या विचारांच्या अवलोकनासाठी, काय उपाय केले होते, कशाचा काय फायदा झाला याचा संदर्भ म्हणून वापरता येतं.
जगभर मानसिक आजारांशी कोणत्या ना कोणत्या कारणांनी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या व्यक्तींनी आपापल्या क्षमता आणि अनुभवांच्या आधारे आरोग्याकडे प्रवास करताना उपयुक्त ठरणारे वेगवेगळे उपाय वापरून पाहिले आहेत. उपचार म्हणून इतर अनेक व्यक्तींना त्यांचा वापर करता यावा म्हणून त्यावर सखोल काम केले आहे. त्यावर वेगवेगळे संस्कार केले आहेत. आपल्यालाही आपल्या वैयक्तिक - सामाजिक अनुभवांच्या आणि क्षमतांच्या आधारे स्वतःला निश्चित लागू पडणारे उपचार शस्त्रं म्हणून या लढाईसाठी वापरता येतील.
मीनाक्षी (मानसोपचारक)
Comments