माझ्या मनाला त्रास होतोय ...
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 3 min read
मन म्हणजे काय हे समजून घेतल्यावर मनाला त्रास होतो म्हणजे काय हे समजून घेणं सोपं होईल. विचार - भावना - वर्तन ह्या सुसूत्र त्रिकोणाची बांधणी हलायला लागली, त्यातल्या कुठल्या तरी एका घटकाची मोडतोड सुरू झाली की मनाच्या वेगवेगळ्या कार्यात लहान - मोठे अडथळे निर्माण व्हायला लागतात. हे अडथळे आपल्याला प्राथमिक लक्षणांच्या स्वरूपात जाणवायला लागतात. भूक - झोप कमी किंवा जास्त होणं, उत्साह कमी होणं, गोंधळ होणं, चिडचिड होणं, उदास वाटणं, एकटं रहावंसं वाटणं, मनात नकारात्मक विचार येणं, पटकन रडू येणं, छोट्या छोट्या गोष्टींचं विस्मरण, कामात लक्ष न लागणं, सतत मूड बदलत राहणं, वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष होणं ह्यापैकी काही ना काही गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात घडत असतात. जेव्हा त्यांचं स्वरूप अगदीच प्राथमिक (क्वचित घडणारं - कमी वेळासाठी टिकणारं आणि सौम्य) असतं; तेव्हा आपण त्याला आयुष्यातल्या चढ - उतारांचा, वळणांचा भाग किंवा टप्पा (phase) म्हणून स्वीकारतो. ह्या लक्षणांच्या वारंवारिता, कालावधी आणि तीव्रता या तीनपैकी कोणत्याही घटकामध्ये वाढ व्हायला लागली की आपण मनाला होणाऱ्या त्रासाच्या म्हणजेच मानसिक अस्वास्थ्याच्या टप्प्यात आहोत असं समजायला हवं.

यापूर्वी आपण हे पाहिलंय की - मानसिक आजार कोणालाही होऊ शकतात. त्यात कोणाचाही दोष नाही. आणि त्यांचा सामना एकत्रितपणे करावा लागतो. त्यामुळे मनाला त्रास व्हायला लागला की आवश्यक ती मदत घेताना संकोच, भीती, लाज बाळगण्याची खरंच गरज नाही. लवकरात लवकर आणि योग्य मदत घेणं हे अस्वास्थ्यातून / आजारातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचं ठरतं. कुटुंबीय - मित्र-मैत्रिणी, भावनिक दृष्ट्या इतर जवळच्या व्यक्तींची मदत होणारा त्रास मोकळेपणाने सांगण्यासाठी नेहमीच घ्यायला हवी. भावना - विचार बोलून दाखवले की तीन -चार फायदे होतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपण एकटेच नाही आहोत ह्याची जाणीव होते. आपल्या जवळच्या व्यक्तींनी त्या त्या वेळी केलेले उपाय - उपचार समजून घेता येतात. पुढे अचानक कधीही गरज पडली तर त्या व्यक्तींना तुमच्या अस्वास्थ्याशी / आजाराशी तोंडओळख असल्यामुळे त्यांनी मदतीला येण्याची शक्यता वाढते.
मात्र लक्षणांच्या पातळीनुसार व्यावसायिक तज्ज्ञांची मदत घेणं केव्हाही हितकारक आहे. व्यावसायिक तज्ज्ञ मुख्यतः दोन प्रकारचे आहेत. एक म्हणजे मानसिक आजारांवर औषधं देणारे डॉक्टर आणि दुसरे मानसोपचार करणारे इतर तज्ज्ञ.
व्यक्तीला होणारा त्रास आयुष्यातला केवळ एक टप्पा असण्याच्या पुढे गेला, म्हणजेच वाढला की त्या त्रासाबद्दल नुसतं बोलून उपयोगी ठरत नाही. त्यावर उपचार करावे लागतात. अगदी प्राथमिक अस्वास्थ्याच्या स्थितीत अनेक मानसिक आजार योग्य शास्त्रीय उपचारांनी पूर्ण बरे होऊ शकतात. त्यासाठी बरेचदा औषधांचाही गरज पडत नाही. ह्यासाठी तुम्ही मानसोपचारकांची (मानसोपचार तज्ज्ञ - मानस शास्त्रज्ञ - मानसशास्त्रीय समुपदेशक) मदत घेऊ शकता. सुरूवातीच्या काळात कमी काळ उपचार घेऊनही मानसिक स्वास्थ्य परत मिळवता येतं किंवा अस्वास्थ्य नियंत्रणात ठेवता येतं. मात्र आपल्याला जाणवणारी लक्षणं प्राथमिक आहेत, अस्वास्थ्याची आहेत किंवा आजाराची आहेत, कुठल्या आजाराची आहेत हे स्वतः ठरवू नये. त्यासाठी वर उल्लेख केलेल्या व्यावसायिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
लक्षणांच्या स्वरूपावरून (तीव्रता, कालावधी आणि वारंवारिता), संख्येवरून आणि लक्षणं नेमकी काय आहेत त्यानुसार मानसोपचारक तुम्हाला मनोविकार तज्ज्ञाकडे पाठवतो. मनोविकार तज्ज्ञ (psychiatrist) हा मनोविकारांचा अभ्यास केलेला डॉक्टर असतो. मानसिक आजारांवर औषधं देण्याचा अभ्यास आणि अधिकार मनोविकार तज्ज्ञांचा असतो. मनोविकार तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ यांचं काम एकमेकांना पूरक असतं. मानसोपचार तज्ज्ञ वेगवेगळ्या मानस शास्त्रीय चाचण्या करून त्यांचा अहवाल मनोविकार तज्ज्ञांना पुरवतात. ज्यामुळे मनोविकार तज्ज्ञांना आजाराचं योग्य निदान करण्यात मदत होते.
साधारणपणे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात मनोविकार तज्ज्ञ असतात. जिल्हा रुग्णालयातील उपचार मोफत किंवा अतिशय कमी खर्चात होतात. याशिवाय समाजात मानसिक आजारांवर / आरोग्यावर काम करणाऱ्या संस्था असतात. आपल्या अस्वास्थ्याच्या काळात आपण नक्कीच अशा संस्थांची मदत घेऊ शकतो. आपल्या मनाला होणारा त्रास ओळखून वेळीच योय त्या व्यक्तीकडे मदतीसाठी जाणं हे मानसिक आरोग्याकडे जाण्याच्या प्रवासातलं पहिलं पाऊल आहे.
हे पहिलं पाऊल जेवढ्या विश्वासाने आणि निश्चयाने उचललं जाईल तेवढा तो प्रवास अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता जास्त!
मीनाक्षी (मानसोपचारक)
Comments