मला अधिकार आहे ...!
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 3 min read
आपल्या समाजात मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींचं प्रमाण आणि मानसिक आरोग्य
क्षेत्रातील तज्ज्ञ व्यावसायिक यांचं प्रमाण खूपच व्यस्त आहे. मुळात मानसिक आजार
किंबहुना अस्वास्थ्य वेळीच ओळखण्या इतपत समाजाची जाणीव जागृत झालेली नाही.
मानसिक आजारांना चिकटलेल्या कलंकाबद्दल आपण आधीच्या लेखांमध्ये वाचलं आहेच. या
सगळ्याचा परिणाम म्हणून मनोविकार तज्ज्ञांकडे येणाऱ्या लोकांची अवस्था आणि संख्या
पाहता त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना किती वेळ द्यावा हा वादाचा विषय होऊ
शकतो. पण म्हणून त्यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी अगदी प्राथमिक गोष्टी सुद्धा
स्वतःहून बोलू नयेत, त्यांचं मानसिक आजारांबद्दलचं अत्यावश्यक शिक्षण करू नये अशी
मुभा त्यांनी स्वतःच स्वतःला घ्यावी का हा सुद्धा मोठा वादाचा विषय ठरू शकतो.
या समस्येवर तोडगा काढायचा झाल्यास मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ
व्यावसायिकांच्या गटाने एकत्रित काम करावं हा त्यावरचा उपाय निश्चितपणे अवलंबता येईल.
आपल्या आजच्या लेखाचा हा विषय नसल्यामुळे आपण खोलात शिरायला नको. रुग्ण आणि
त्यांचे नातेवाईक म्हणून आपल्यालाही काही अधिकार आहेत, त्यांचा योग्य उपयोग आपण
करून घेऊन मानसिक आरोग्याबद्दलची आपली जबाबदारी पार पाडणं हे आपलं त्या
अधिकारांसोबत येणारं कर्तव्य सुद्धा आजच्या लेखात समजून घेऊया.

रुग्ण आणि त्याचे नातेवाईक यांना रुग्णाला होणाऱ्या त्रासाबद्दल, त्याच्या आजाराच्या
निदानाबद्दल, उपचारांबद्दल समजून घेण्याचा अधिकार हा रुग्ण हक्कांमधील पहिला हक्क
आहे. रुग्ण त्याला होत असलेला त्रास सांगत असला, तसेच त्याच्यासोबत राहणाऱ्या जवळच्या
व्यक्तींना रुग्णाला होणारा त्रास बाह्य लक्षणांच्या स्वरूपात लक्षात येत असला तरी
त्यामागच्या मेंदूतल्या रासायनिक क्रिया, मानसिक - भावनिक उलथापालथ, कारणं हे लक्षात
येत नाही. तिथेच तर तज्ज्ञ लोकांनी त्या विशिष्ट रुग्णाच्या आजाराचं निदान, स्वरूप,
साधारणपणे काय काय होऊ शकतं हे समजावून सांगणं गरजेचं ठरतं. त्यामुळे रुग्णाच्या
आणि त्यांच्या नातेवाइकांच्या छोट्या छोट्या अनेक शंका दूर व्हायला मदत होते. हे शंका
निरसन मानसिक आजारांबद्दलचे, आजारी व्यक्तींबद्दलचे सामाजिक गैरसमज कमी
करण्याच्या दृष्टीने, गैरसमज पसरू नयेत म्हणून फारच महत्वाचं आहे.
मानसिक आजारांवर केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये त्या त्या समाजाच्या विशिष्ट संस्कृतीचा
खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे मानसिक आजारांवरच्या औषधोपचारांपर्यंत पोचायला कुटुंबाना
खूप वर्षांचा काळ लागतो. त्यातच औषधांनी रुग्ण अपेक्षित काळात अपेक्षित प्रमाणात बरा
होताना दिसत नाही, औषधांचे दुष्परिणाम होतात, औषधांची सवय लागते, ती झोपेची औषधं
असतात अशा कित्येक समज- गैरसमजांमध्ये औषधं थांबवली जातात. मानसिक आजारांतून
बाहेर पडण्यासाठी मुळातच औषधांबरोबरच इतर उपचारांची गरज पडते. कारण मानसिक
आजार होण्यामध्ये मनोव्यापार, व्यक्तिमत्व जडणघडण आणि कौटुंबिक - सामाजिक
वातावरण या सगळ्यांचा मोठा वाटा असतो. म्हणूनच मानसिक रुग्णांनी आणि त्यांच्या
नातेवाइकांनी त्या विशिष्ट आजारावर नक्की काय काय उपचार करायला हवे आहेत, त्यापैकी
औषधांचं काम काय आहे, औषधांनी काय आणि कसे परिणाम होणार आहेत आणि इतर
उपचार काय आणि कसे परिणाम करू शकतील हे नीट समजून घ्यायला हवं. केवळ
औषधांचेच नाहीत तर मानसोपचारांचे सुद्धा दुष्परिणाम होऊ शकतात. ते काय काय असू
शकतील, त्यांना काबूत ठेवण्यासाठी काय करायला हवं हे सगळं समजून घ्यायला लागेल.
त्यानंतर उपचारांमधून काय अपेक्षा ठेवायची, औषधोपचारांच्या परिणामांची नोंद कशी ठेवायची,
ते परिणाम (चांगले किंवा दुष्परिणाम) कसे तपासायचे, त्यांच्याबद्दल कसा विचार करायचा हे
सगळं कळायला लागेल. ह्याचा परिणाम चुकीच्या अपेक्षांमुळे औषधोपचार खंडित न करण्यात
होईल.
म्हणजेच औषधं आणि इतर मानसोपचार सातत्याने घेतल्यामुळे आजारातून बाहेर पडण्याची
प्रक्रिया योग्य दिशेने आणि सातत्याने होत राहील. पुन्हा ह्यातली प्रत्येक छोटी गोष्ट
मानसिक आजार, आजारी व्यक्ती यांच्याबाबतचे गैरसमज दूर करायला, त्यांच्याभोवतालचा
कलंक कमी करायला, मानसिक आजारातून बाहेर पडून व्यक्ती कार्यक्षम झाल्याची उदाहरणं
समाजासमोर यायला निश्चितपणे होईल.
सर्वांत महत्वाची सकारात्मक गोष्ट ह्या अधिकाराच्या बजावणीतून रुग्ण आणि त्यांचे
नातेवाईक साध्य करू शकतील. ती म्हणजे मानसिक आरोग्य ही संपूर्ण समाजाची जबाबदारी
आहे असं म्हणत असतांना अस्वास्थ्य - आजाराची लक्षणं ओळखून त्यावर कधी आणि
कोणते उपचार घ्यायचे याचा निर्णय घेणं, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय त्यात खंड पडू द्यायचा
नाही, उपचाराचे परिणाम व्यवस्थितपणे लक्षपूर्वक नोंदवून तज्ज्ञांना सांगायचे ह्या सगळ्याची
जबाबदारी स्वतः रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुद्धा घेऊ लागतील. सगळ्याच्या परिणामी
मानसिक आरोग्य क्षेत्रात शास्त्रीय, बहुआयामी आणि निकोप दृष्टिकोन तयार व्हायला सुरूवात होईल.
मीनक्षि (मानसोपचारक)
Comments