तुम्ही मला साथ देणार ना?
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 2 min read
मानसिक आजाराला स्वीकारणं म्हणजे नेमकं काय हे आपण या लेखात समजून घेऊया. आता मुळात मानसिक आजारातून जाणाऱ्या व्यक्तीने जेवढं आजाराला स्वीकारायला हवं, समजून घ्यायला हवं त्याआधी आणि त्यापेक्षा जास्त काळजीपूर्वक मानसिक आजारातून जाणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी आजार आणि आजारी व्यक्ती ह्यांना समजून घ्यायला हवं, स्वीकारायला हवं.
मानसिक आजाराचा त्रास होणाऱ्या व्यक्तीला तीव्र लक्षणांच्या प्रत्यक्ष काळात आजार समजून घेणं अवघड आहे. लक्षणं आटोक्यात आली की आजार आणि त्यासंबंधीचे सगळे घटक आजारातून जाणाऱ्या व्यक्तीला सुद्धा निश्चितपणे समजून घेता येतात. मात्र त्या व्यक्तीची अंतरदृष्टी (insight) टिकून असेपर्यंतच ही समज टिकून राहणार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.
नातेवाईकांना आजार समजून घेऊन आजारातून जाणाऱ्या आपल्या प्रिय व्यक्तीला साथ देणं शक्य आहे. त्यातही नातेवाइकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देणारी, मदत करणारी यंत्रणा तयार करणं गरजेचं ठरतं. त्याअर्थाने ही विचारणा नातेवाइकांनी इतरांना केलेली आहे.

आजार स्वीकारणं म्हणजे आजारी व्यक्तीला नीटसं समजत नाही, ती फार काम करू शकणार नाही, ती झोपून राहील किंवा हिंसक वागेल, तिच्यात सुधारणा होणार नाही असं केवळ आहे त्या परिस्थितीला शरण जाऊन नाईलाजाने त्या व्यक्तीचा नुसता सांभाळ करत राहणं नव्हे! तर आपल्या जवळच्या व्यक्तीचा आजार कोणता आहे, त्याची सामान्य लक्षणं काय असतात, आपल्या जवळच्या व्यक्तीला त्यापैकी कुठली लक्षणं जाणवतात, कुठली जास्त प्रमाणात जाणवतात, ती कधी तीव्र होतात, कोणत्या गोष्टींनी आजाराने त्रस्त व्यक्तीचा ताण वाढतो, कोणत्या गोष्टींनी थोडा कमी होतो हे सगळं लक्षपूर्वक निरीक्षण करून काळजीपूर्वक नोंदवून ठेवणं महत्वाचं आहे. तसंच त्याबद्दल रुग्णाशी, त्याच्या डॉक्टरांशी आणि मानसोपचार तज्ञांशी बोललं जायला हवं.
आजार स्वीकारण्यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की आजाराचं कारण समजल्यानंतर दोषारोप न करता आजार बरा होण्याच्या दृष्टीने काय उपाय आणि उपचार करायला हवेत हे समजून घेऊन त्याप्रमाणे आखणी आणि नियोजन करणं. आजाराने त्रस्त व्यक्ती सर्व वेळ आजाराच्या लक्षणांच्या प्रभावाखाली असेलच असं नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा आजारी व्यक्तीला जी जी कामं करता येतील ती ती कामं करायला संधी देणं, तसा विश्वास दाखवणं हे आजाराला स्वीकारलं असल्याचं द्योतक आहे.
जेवढ्या लवकर मानसिक आजाराला रुग्णाचे नातेवाईक स्वीकारतील तेवढ्या लवकर रुग्ण स्वतःचा आजार स्वीकारू शकेल. कौटुंबिक आणि सामाजिक सण - समारंभांमध्ये रुग्णाला सामावून घेणं हा मानसिक आजाराचा स्वीकार केल्याचा आणखी एक महत्वाचा निदर्शक निकष आहे. आजार न लपवता सामान्यपणे इतर नातेवाईक आणि समाजातील व्यक्तींना सांगता येणं, आजाराच्या लक्षणांबद्दल सहजतेने बोलता येणं आणि आवश्यक मदत व्यवस्थितपणे मागता येणं ह्यावरून आपण आजाराला किती आणि कसं स्वीकारलं आहे हे आपल्याला ठरवता येईल.
आजाराचं निदान झाल्यावर लगेचच स्वीकार होईल आणि पूर्णपणे होईल ही अपेक्षा समाज जागृतीच्या सद्य पातळीवर फारच उच्च कोटीची ठरेल. मात्र काही काळ आजाराचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेतल्यानंतर त्या प्रक्रियेतून जाऊन स्वीकाराच्या मार्गावर पुढे पुढे वाटचाल होणं आजारातून बाहेर पडण्याच्या दृष्टीने खूप मोलाची बाब ठरते.
ह्याच सगळ्या प्रक्रिया रुग्णाच्या बाबतीत स्वतः आजाराचा स्वीकार करण्यात लागू पडतात. फक्त काही काळासाठी रुग्णाची insight वर खाली (कमी -जास्त) होऊ शकते हे नातेवाईक आणि इतर सुज्ञांनी लक्षात ठेवावे हे बरे!
मीनक्षि (मानसोपचारक)
Comments