कुटुंबाची साथ मोलाची ...
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 1 min read
मानसिक आजार आजाराने त्रस्त व्यक्तीची वारंवार विविध पातळ्यांवर घसरण करत असतात. बौद्धिक पातळीवरच्या गोंधळामुळे दैनंदिन व्यवहार सुद्धा अवघड होऊन बसतात. सततच्या भावनिक - मानसिक चढ - उतारांमुळे नातेसंबंध बिघडतात. संवाद आणि इतर कौशल्यं कमतर झाल्यामुळे सामाजिक जीवन विस्कळीत होते. उत्पादकता कमी होते किंवा अधून मधून काही काळासाठी पूर्ण बंद होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून आजाराने त्रस्त व्यक्तींना एकाकीपणा, निराशा, भीती, न्यूनगंड, अपराधीपणा, नालायकपणा अशा टोकाच्या नकारात्मक भावनांचा सामना करावा लागतो.

आजारातून बाहेर पडण्यासाठी स्वतःला प्रशिक्षित करत असतानाच या भावनिक-मानसिक चढ उतारांमुळे अनेकदा या प्रयत्नांवर मर्यादा पडतात, पाणी पडते. मानसिक आजारातून बरं होण्याचा प्रवास भरपूर आणि तीव्र वळणावळणांचा आहे. या प्रवासात आजाराने त्रस्त व्यक्तीला वेळोवेळी मदतीची, आधाराची गरज पडणार आहे. कुटुंबातील व्यक्तींनी आजाराने त्रस्त व्यक्तीचा सहजपणाने केलेला स्वीकार त्या व्यक्तीची आजारातून बाहेर पडण्याची उमेद वाढवतो.
आजार आणि त्यावरचे उपचार समजून घेणं, त्यासाठी आजाराने त्रस्त व्यक्तीला तयार करणं, वेळच्यावेळी उपचारांसाठी घेऊन जाणं, आजाराची कमी -जास्त होणारी लक्षणं निरीक्षणपूर्वक नोंदवणं, ती लक्षणं डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देणं ह्या जबाबदाऱ्या कुटुंबियांना पार पाडाव्या लागतात.
आजाराने त्रस्त व्यक्तीला सातत्याने अधून मधून प्रोत्साहन देत रहावं लागतं. त्याने केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करून त्याला हळूहळू आत्मविश्वास मिळवून देता येतो. लहान मूल जसं एकेक करत गोष्टी शिकत जातं; तोच सगळा प्रवास टप्प्याटप्प्याने पुन्हा करावा लागतो. आजारी व्यक्तीसोबतच त्या कुटुंबाच्या भावनिक - मानसिक चढ उतारांचा आलेख बदलत जाऊ शकतो. हे लक्षात घेऊन कुटुंबातल्या व्यक्तींना खंबीर रहावं लागतं. स्वतःचं शारीरिक-मानसिक आरोग्य राखत, छंद - आवडी-निवडी जोपासत आजाराने त्रस्त व्यक्तीला तिच्या जीवनातल्या खाच-खळग्यांना सामोरं जायला बळ द्यावं लागतं. दीर्घकाळ चालणाऱ्या या लढ्यात कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला निश्चित आणि ठाम भूमिका बजावावी लागते.
''तुला तुझा आजार समजला आहे, त्यावर उपचार-उपाय करण्यामध्ये तुझी मोलाची भूमिका आहे आणि आम्ही तुझ्यासोबत आहोत'' हा कुटुंबाने कृतीतून दिलेला विश्वास आजाराने त्रस्त व्यक्तीला बरं होण्याची खात्री देतो.
मीनाक्षी (मानसोपचारक)
Comentários