कारण आपण समाज नावच्या एकाच कुटुंबात राहतो ...!
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 2 min read
आरोग्य हा व्यक्तिमत्वाचा असा घटक आहे, ज्याचा थेट परिणाम व्यक्तिमत्वाच्या इतर पैलूंवर दिसून येतो.
तसंच वैयक्तिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. वैयक्तिक आणि
सामाजिक आरोग्याचा एकमेकांवर निश्चित स्वरूपाचा थेट परिणाम होत असतो. वैयक्तिक आरोग्य ही प्रत्येक
व्यक्तीची स्वतः प्रति असलेली प्राथमिक जबाबदारी आहे तद्वतच सामाजिक आरोग्य ही त्या त्या समाजाची
प्राथमिक जबाबदारी आहे.
अजूनही आपल्या समाजाची आरोग्याकडे पुरेसं लक्ष देण्याची मनोवृत्ती घडलेली दिसत नाही. मानसिक
आरोग्याबद्दल तर आपल्या समाजाची स्थिती बिकट आणि दुर्दैवी आहे. एखाद्या गोष्टीकडे एखादा समाज ज्या
दृष्टिकोनातून बघतो तो समाज त्या गोष्टीची त्या पद्धतीने जबाबदारी घेतो. आत्ता आत्ता शारीरिक
आरोग्याच्या काही पैलूंची जबाबदारी आपण वैयक्तिक - कौटुंबिक - सामाजिक पातळीवर घ्यायला शिकत
आहोत. मानसिक आरोग्याबाबत अजून दिल्ली दूर आहे!
मानसिक आजार होण्यात अनुवंशिकतेचा जसा सहभाग आहे, तसाच तो कौटुंबिक - सामाजिक
परिस्थितीचाही आहे. किंबहुना आनुवंशिकतेचा वाटा २०-५०% आहे मात्र कौटुंबिक - सामाजिक
परिस्थितीचा सहभाग ५०-८०% एवढा मोठा आहे. कारण अनुवंशिकतेच्या घटकाला खतपाणी मिळालं की
तो आजार दृश्य स्वरूपात पटलावर येतो. आजार होण्याच्या शक्यतेला खतपाणी घालणाऱ्या गोष्टींचा
अभाव आजाराला रोखून धरू शकतो हे जसं आणि जितकं खरं आहे, तसं आणि तितकंच खरं हेही आहे की,
आजाराला खतपाणी घालणाऱ्या गोष्टींचा प्रत्यक्ष सहभाग आजार दृश्य स्वरूपात आणण्यासाठी मोठ्या
प्रमाणात सहाय्यीभूत ठरतो.

तसंच आजाराची प्राथमिक लक्षणं जाणवली की लवकरात लवकर औषधं आणि इतर मानसोपचार
घेण्यासाठी त्याची समज समाजात मोठ्या प्रमाणावर असणं आवश्यक ठरतं. आरोग्य सेवा उपलब्ध असणं,
त्यांचा दर्जा उत्तम असणं, त्या परवडणाऱ्या असणं, त्या घेण्याची मानसिक तयारी असणं हे सर्व घटक
समाजाच्या नियंत्रणात असू शकतात. त्यासाठी तो समाज तेवढा जागरूक आणि जबाबदार असणं ही पूर्वअट
ठरते.
म्हणूनच समाजाचा घटक म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला मानसिक आरोग्य, अस्वास्थ्य आणि आजार
याबाबतची जाण असणं आवश्यक आहे. तसंच मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तींशी काय बोलावं, कसं बोलावं,
कसं वागावं याचं इतरांना असलेलं भान आजाराने त्रस्त व्यक्तीला आजारातून बाहेर पडायची आशा निर्माण
करणारं ठरू शकतं. आपण आजाराने त्रस्त व्यक्तीला आणि तिच्या कुटुंबाला मदत करू शकत नसू तर किमान आपण त्यांना त्रासदायक ठरेल असं वर्तन करणार नाही याची खबरदारी आणि काळजी प्रत्येकाला घेता येईल.
सामान्य व्यक्ती म्हणून पूर्णपणे माझ्या हातात असलेल्या काही गोष्टी मी निश्चितपणे करू शकतो. एक म्हणजे
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीची हेटाळणी, टिंगल- टवाळी, चेष्टा करणार नाही. कोणी अशी चेष्टा, टिंगल,
हेटाळणी करत असेल तर मी त्यात सहभागी होणार नाही. माझ्या देखत असं वर्तन घडत असेल तेव्हा मी ते
करणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीन, किंबहुना किमान नाराजी तरी व्यक्त करीन.
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीला मी सहजतेने मदत देऊ करेन. मला त्या व्यक्तीच्या आजाराविषयी
व्यवस्थित, शास्त्रीय माहिती नसताना मी सल्ला किंवा उपदेश करणार नाही.
आजाराने त्रस्त व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्यक्ष मदत आवश्यक असेल आणि मला ती करता येणं शक्य असेल तर
मी निश्चित करेन.
माझं मानसिक आरोग्य नीट सांभाळण्याची जबाबदारी मी घेईन; म्हणजेच आरोग्याच्या दृष्टीने हितावह
गोष्टी मी नियमित करेन आणि आरोग्याला घातक गोष्टी कटाक्षाने टाळेन.
माझ्या किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींच्या मानसिक अस्वास्थ्याच्या / आजाराच्या काळात आवश्यक
असलेली मदत मी मोकळेपणाने मागेन आणि तेवढ्याच मोकळेपणाने स्वीकारेन.
ह्या गोष्टी वैयक्तिक पातळीवर आपण करणार असू तर अर्थातच आपल्याला मानसिक आरोग्य, अस्वास्थ्य, आजार याबद्दल स्वतःची समज वाढवणं क्रमप्राप्त आहे.
मीनक्षि (मानसोपचारक)
Comments