आपल्याला आजाराशी लढायचंय ....
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 2 min read
मानसिक आजाराला तोंड देणं म्हणजे दीर्घकाळाची लढाई असते. आजाराच्या बाह्य लक्षणांबरोबरच आजाराने त्रस्त व्यक्ती भावना-विचारांच्या पातळीवर सतत लढत असते. कुटुंबियांनाही बहुतांश वेळेला समाजाकडून होणारी अवहेलना, उत्पादकतेत एका व्यक्तीची होणारी कमतरता, आजारामध्ये होणारे चढ-उत्तर, उपचारांचा खर्च यांच्या ताणाला सामोरं जावं लागतं. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीचं कौटुंबिक वातावरण बरेचदा ताणतणाव, दडपण, उदासीनता आणि चिडचिड - भांडणं यांनी ग्रासलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे मानसिक आजारांना समजून घेण्यातली आपली असमर्थता.
आजारी व्यक्तीबरोबर 'तू मुद्दाम करतेयस, एवढं कसं लक्षात येत नाही?, नको त्या गोष्टी कशा काय कळतात?' अशा प्रकारचे दोष देऊन भांडणांना सुरूवात होते. कुटुंबातल्या इतर व्यक्तींची आपापसात सुद्धा बरेचदा आजाराने त्रस्त व्यक्तीला कसं वागवावं, त्याच्याशी / तिच्याशी काय बोलावं, काय अपेक्षा ठेवाव्यात, कोणती कामं सांगावीत, त्याला कसं समजवावं, त्याची औषधं आणि इतर उपचार या सगळ्या मुद्द्यांवरून मतभेद - वादविवाद - भांडणं होत जातात. रोजच्या रहाटगाडग्यात एक मोठी लढाई लढण्याची ताकद कधीच संपून जाते. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आणि कोण चूक-कोण बरोबर हे ठरवण्यात वेळ आणि ऊर्जा यांचा एवढा अपव्यय होतो की खरी लढाई बाजूला पडते.

मानसिक आजार समजून घेणं म्हणजे मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती लक्षणांच्या स्वरूपात काय काय वर्तन करते हे आणि एवढंच नाही. तर मानसिक आजारामध्ये मेंदूतल्या नक्की कोणत्या प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण होतात, काय अडथळे निर्माण होतात हे समजून घेणं होय. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती जशी वागते; त्यामागची कारणमीमांसा लक्षात घेणं.
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांनी नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की, लढाई अजार्सोबत करायची आहे. एकमेकांच्यात जेवढे जास्त मतभेद, वादविवाद - भांडणं तेवढा जास्त फायदा आपल्या शत्रूला म्हणजेच आजाराला होणार आहे. आजारी व्यक्ती आणि कुटुंबीय किंवा कुटुंबीय आपसात लढतील तेवढी आपली ताकद कमी होत जाणार आहे आणि आजार बळावत जाणार आहे. मानसिक आजार ज्याप्रमाणात कौटुंबिक-सामाजिक हानी करतात, त्यांच्याशी टक्कर देण्यासाठी एकत्रितपणे लढणं हीच मोठी जमेची बाजू असते.
म्हणून आजाराने त्रस्त व्यक्ती, तिचे कुटुंबीय आणि समाजातील इतर घटकांनी सुद्धा हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे - आपल्याला आजाराशी लढायचं आहे; एकमेकांशी नाही!
मीनाक्षी (मानसोपचारक)
Comments