आत्महत्त्या ? नव्हे; मदतीची हाक!
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 3 min read
आपल्या आजूबाजूला कोणी आत्महत्या केल्याचं आपल्याला कळलं की पहिल्यांदा आपल्या
मनात ‘काय कारण असेल?’ असा प्रश्न उभा राहतो. आणि त्या कारणांचा शोध घेत असताना
आपण केवळ भौतिक कारणेच लक्षात घेतो. जसे की, परीक्षेत नापास होणे, प्रेमभंग होणे,
नोकरी न मिळणे वगैरे वगैरे.
ज्या घटनांमुळे एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली असावी असे आपल्याला वाटते, तशा
घटना इतर सर्व लोकांच्या बाबत घडताना आपण पाहत असतो, अनुभवत असतो. तरीही
सगळ्याच व्यक्ती आत्महत्येच्या विचारांनी ग्रासल्या जात नाहीत. आणि आत्महत्येच्या
विचारांनी ग्रासलेल्या सर्वच व्यक्ती आत्महत्येची प्रत्यक्ष कृती करत नाहीत, असं का?
आत्महत्येच्या विचारांमागे त्या व्यक्तीचा आयुष्यातल्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन, मेंदूतल्या
रसायनांचा असमतोल यांच्याबरोबरच त्या वेळी निर्माण होणाऱ्या प्रबळ भावनांचा हात असतो. दृष्टिकोन
तर अनेक वर्षांपासून, अनेक घटनांमधून, विचार – भावनांच्या प्रक्रियेतून तयार होत असतो. रसायनांचा
असमतोल केवळ धक्कादायक प्रसंगांमध्येच अचानक बिघडतो. अन्यथा तो बदलायला सुद्धा अनेक वर्षांचा
काळ लागतो. त्याबद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर समजून घेऊया. मात्र आत्महत्या करण्याचे विचार
ज्यावेळी मनात घोळत असतात तेव्हा नेमक्या कोणत्या भावना प्रबळ असतात हे आजच्या लेखात समजून
घेऊया.
व्यक्ती संकटांचा सामना करून (अर्थातच त्या व्यक्तीच्या स्वतःच्या विचारांच्या क्षमतेनुसार, ताकदीनुसार,
सवयीनुसार) थकते. त्यावेळी भावनिक पातळीवर त्या व्यक्तीला तीन प्रकारच्या नकारात्मक भावनांना तोंड
देता येत नाही. त्या भावना म्हणजे असहायता (helplessness), नैराश्य (hopelessness) आणि
नालायकपणा (worthlessness). या भावनांना नेमकेपणाने समजून घेऊया. अशा व्यक्तींना मदत
करताना आपल्याला या भावना समजून घेऊन प्रथमतः सकारात्मक भावना निर्माण करण्याचंच तर काम
करायचं आहे.

या परिस्थितीत मला मदत मिळू शकत नाही, कोणीच मला काहीच मदत करूच शकत नाही हे विचार
म्हणजे असहाय्यतेची भावना. जेव्हा व्यक्तीला असहाय्य वाटतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात असे विचार येत
असतात. किंवा याच्या उलट अर्थी जेव्हा व्यक्तीच्या मनात असे विचार येतात तेव्हा त्यामुळे ही भावना
ग्रासून टाकते. नैराश्य ही भावना आशेच्या अभावामुळे तयार होते. माझी परिस्थिती बदलण्याची काहीच
शक्यता नाही या विचारामुळे आशा लोप पावते किंवा आशा वाटत नसल्यामुळे असे विचार येतात. जेव्हा
या दोन्ही भावना आणि त्याबरोबरचे विचार बळावत जातात त्यावेळी व्यक्तीच्या जगण्याची उर्मी शून्य
होऊन रिकामेपण / पोकळी जाणवते. जीवनाचा अर्थ हरवल्याची भावना दाटून येते. जीवन जगण्याची
माझी लायकी नाही, मी जगून काही उपयोग होणार नाही, माझ्यामुळे इतरांना त्रास होतो, मी मेलो तर
सगळे प्रश्न सुटतील असे विचार काहूर माजवतात.
काही व्यक्ती आपल्या जवळच्या (भावनिक दृष्ट्या जवळच्या वाटणाऱ्या) व्यक्तीपाशी बोलताना यापैकी
काही विचार – भावना मांडण्याचा – व्यक्त करण्याचा खटाटोप करतात. फक्त बरेचदा हा प्रयत्न ती
जवळची व्यक्ती समजून घेऊ शकत नाही. किंवा समजून घेता आलं तरी त्यावर मार्ग कसा काढायचा याचं
कौशल्य त्या व्यक्तीकडे नसतं. म्हणूनच एखादी व्यक्ती जेव्हा अशा प्रकारच्या भावना – असे विचार स्पष्टपणे
किंवा पुसटसे बोलून दाखवते त्यावेळी त्या व्यक्तीला असणारी मदतीची नेमकी गरज ओळखणं महत्वाचं
आहे.
तुला काय कमी आहे म्हणून असा विचार करतोयस, जीवन किती सुंदर आहे आणि तू उगीच काहीतरी
धरून बसलीयेस, नको जास्त विचार करू, chill मार, काही होत नाही – एवढ्या तेवढ्याने मरायला
कशाला हवंय असे तत्वज्ञानाचे सल्ले त्या भावनिक – वैचारिक आंदोलनांच्या वादळात फारसे उपयोगी
ठरत नाहीत हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊया. त्या व्यक्तीच्या आत खोलवर घोंघावणारं भावनिक –
वैचारिक वादळ शांत करणं ही पहिली पायरी आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला तिच्या परिस्थितीतून बाहेर
पडण्याचे मार्ग शोधायला मदत करावी लागते.
ह्यासाठी निश्चितपणे मनाचे व्यापार जाणणाऱ्या तज्ञ व्यक्तीची मदत घेता येते. आवश्यकता असेल तर
मनोविकार तज्ञांच्या सल्ल्याने औषधं सुरू करावी लागू शकतात. व्यक्तीच्या मनातील भावना – विचारांचं
वादळ थोडं शमलं की मग मानसोपचारांच्या सहाय्याने जीवनाकडे / घटनांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातील
बदल, विचारांना सकारात्मक दिशा देण्याची सवय लावून घेणं, भावनांची योग्य प्रकारे हाताळणी करणं
अशा प्रकारचे ठोस बदल निश्चितपणे करता येतात.
मात्र त्याआधी जेव्हा व्यक्तीला आत्महत्या करावीशी वाटते किंवा व्यक्ती आत्महत्येच्या प्रयत्नांतून वाचते
तेव्हा त्या व्यक्तीला सहानुभूतीने, आत्मीयतेने समजून घेतल्याने तिची जगण्याची उर्मी वाढते. व्यक्तीच्या
भावनिक – वैचारिक आंदोलनांना समजून घेऊन मी तुझ्या सोबत आहे असं शब्दांतून म्हणणं आणि कृतीतून
दाखवणं ही गोष्ट आपल्यापैकी अनेकांना करता येण्यासारखी आहे. आत्महत्येची भावना – विचार येणं ही
सामान्य बाब आहे आणि समस्येवर उत्तर शोधण्यासाठी / परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग
शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेता येईल याची माहिती देणं आपल्यापैकी प्रत्येकाला शक्य आहे. त्यातून
त्या व्यक्तीला आशा दाखवत असताना आपण स्वतःच्या मनाला सुद्धा आशेचा किरण दाखवत असतो हे निश्चित स्वरूपाचं सत्य आहे.
मीनक्षि (मानसोपचारक)
Comments