It's not intentional act!
- Meenakshi Alawani
- May 6, 2024
- 2 min read
मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती कायमच आजाराची सगळी लक्षणं दाखवत नाहीत. बरेचदा अशा व्यक्ती अगदी सामान्यपणे बोलतात, वागतात. त्यामुळे आजाराने त्रस्त व्यक्तीबद्दल तिच्या जवळच्या नातेवाईकांना शंका निर्माण होतात. त्यामुळे बहुतांश वेळा आजाराने त्रस्त व्यक्तींना घरच्यांचा राग - रोष, द्वेष - तिरस्कार, बाहेरच्या लोकांची टिंगल-टवाळी अशा आजारापेक्षाही जास्त त्रासदायक गोष्टींचा सामना करावा लागतो.
खरंच आजार आहे की ती व्यक्ती मुद्दाम करतेय असं सारखं मनात येणं, एखादी गोष्ट बरोबर कळते, लक्षात येते मग बाकीच्या गोष्टी का कळत नाहीत, साध्या साध्या गोष्टी कळत नाहीत आणि कठीण, अवघड, गहन अशा गोष्टी कशा कळू शकतात असं वाटणं साहजिक आहे.

पण म्हणून आजाराने त्रस्त व्यक्ती नाटकं करतेय, मुद्दाम करतेय, नखरे आहेत सगळे असं समजणं अगदीच बाळबोध समजुतीचं ठरेल. मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती अशा का वागतात हे समजून घेण्यासाठी मानसिक आजारांचं स्वरूप समजून घ्यावं लागेल. मानसिक आजार होतो म्हणजे काय ते समजून घ्यावं लागेल.
मेंदूतली रसायनं आपल्या विचार-भावना-वर्तनाला कारणीभूत असतात. ह्या रसायनांच्या विशिष्ट प्रमाणामुळे, त्यांच्या विशिष्ट सुसूत्र कामामुळे आपण सामान्य माणसासारखे वागत असतो. मात्र मानसिक आजारांमध्ये यापैकी कुठल्यातरी रसायनाचा तोल ढळतो, प्रमाण कमी / जास्त होतं. त्याच्याच परिणामी व्यक्तीची विचार-भावना-वर्तन साखळी किंवा चक्र विस्कळीत होतं.
त्या व्यक्तीला स्वतःला सुद्धा हे असं का होतंय, कधी होईल हे कळत नाही. ते त्या त्या वेळी लक्षात येईलच असंही नाही. आपण, समाजातल्या इतर व्यक्तींनी लक्षात ठेवण्याची बाब एवढीच की मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती खरोखरच काही गोष्टी मुद्दाम करत नाहीये. काय गोष्टी मुद्दाम सहानुभूती मिळण्यासाठी, आजाराचा फायदा उठवण्यासाठी केल्या जाऊ शकतात आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी आजाराने त्रस्त व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी समुपदेशक, मानसोपचार तज्ज्ञ यांच्याशी बोललं गरजेचं आहे.
आजाराने त्रस्त व्यक्तींनी आजार समजून घ्यावा, त्यावरच्या उपायांमध्ये शक्य तेवढी साथ द्यावी म्हणून त्या व्यक्तींना नियमित औषधांबरोबरच मानसोपचारांची गरज असते.
एकदा का आपण रसायनांची भूमिका समजून घेतली की आजाराने त्रस्त व्यक्ती 'मुद्दाम करत नाहीये' हे समजणं आणि पटणं आपोआपच जुळून येतं.
मीनाक्षी (मानसोपचारक)
Comments